Spread the love

 

 

मूळ हिन्दी कथा – खोईंछा  मूळ हिंदी लेखिका  नीतू सुदीप्ति `नित्या’

अनुवाद – उज्ज्वला केळकर

स्टील सिटी जमशेदपूरला राहणारी आत्या उद्या आपल्या माहेरी येणार आहे. त्या येणार असल्याने सगळ्यांनाच आनंद झाला आहे, पण थोडी थोडी भीतीही वाटते आहे. कारण लव्ह मॅरेज करणं तिला पसंत नव्हतं आणि मी तर लव्ह मॅरेज करून या घरात आले होते.

एका महिन्यांनंतर माझ्या लग्नाला एक वर्ष होईल. आत्याने आपल्या मुलीला जहर घेऊन मरू दिलं, पण तिला हवं तिथे तिचं लग्न नाही करून दिलं. मला पाहून

ती घरात काय वादंग निर्माण करेल आणि गोंधळ घालेल, याबद्दल घरातल्या सगळ्यांइतकीच मलाही काळजी लागून राहिली होती. आई सांगत होत्या, आत्या सामान्य परिवारातली मुलगी. दिसायला अतिशय देखणी. गोरी, शेलाटी, डोळे मोठे आणि काजळ लावल्यासारखे. सावळ्या रंगाच्या डॉक्टरांच्या आई-वडलांनी आत्याला बघितलं आणि एक जोडी कपड्यावर लग्न करून तिला आपल्या घरी घेऊन गेले.

श्रीमंत घरातील सून झाल्यावर आत्या वेळोवेळी माहेरच्यांना मदत करू लागली. ती स्वत:ही पुढे शिकली आणि आपल्या भावंडांचा शिक्षणाचाही खर्च करू लागली.

आता ती एक सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ती आहे. किती तरी शाळा कॉलेजेस आणि  होस्पीटल्स तिने उघडली आहेत. हुंड्यासाठी सोडलेल्या स्त्रियांना त्यांच्या सासरी पुन्हा वसवलय. अनाथ मुलांचं जीवन सावरलय. परित्यक्ता स्त्रियांना काही कला, हुनर शिकवून त्यांना समाजाशी जोडत राहिलीय. 

इतक्या हळव्या मनाची असूनही आत्या आपल्या एकुलत्या एका मुलीच्या मृत्यूचं कारण बनली , हे ऐकून मला खूप वाईट वाटलं. तिनं आपल्या मुलीचं घर तिच्या प्रियकराबरोबर वसवलं असतं तर काय बिघडलं असतं?  या गोष्टी मळे आत्याच्या चांगल्या गुणांवरही पडदा पडलाय, असं मला वाटत राहीलं. त्याच वेळी माझ्या मनात त्यांच्याबद्दल एक प्रकारची भीतीही निर्माण झाली. सामाजिक कार्यकर्ता केवळ बाहेरच भाषणाबाजी करतो. दोन प्रेमिकांचं मीलन घडवतो पण आपल्या घरात मात्र तो हुकूमशहा होतो आणि प्रेमाचा शत्रू बनतो, असंच काही  तरी माझं मत आत्यांबद्दल झालं होतं. रात्रभर याच विचारांची उलथा-पालथ माझ्या मनात चालली होती. आत्या आल्यावर मी त्यांच्याशा कसा सामना करू शकणार होते, माझ्या मनात येत होतं.

सकाळी दोन-तीन वेळा आई कीचनमध्ये आल्या. ‘भाजीत तेल, मसाले व्यवस्थित घाल. ताईंना चांगलं खायची सवय आहे. ओवा घालून दाल, तिखटा-मिठाचा खस्ता, कचोरी बनव. फक्त छेनाचीच भाजी बनव. त्यात मटार घालू नको. भरलेले परवळ आणि भेंडीची भाजी बनव. गाजराचा हलवा चांगल्या तुपात परतून बनव. डालडा वापरू नको. रसगुल्ले बनव. ते चागले स्पंजी होऊदेत. तू स्वैपाक चांगलाच करतेस पण जास्त चांगला करण्याचा प्रयत्न कर. तू केलेलं जेवण ताईंना आवडलं पाहिजे बरं का!

‘हं’ मी पनीर परतत म्हंटलं . माझ्या स्वैपाकाबद्दल  तक्रार होऊ नये, म्हणून मी प्राणपणाने कामाला लागले.

लांबलचक चमकदार कारमधून आत्या उतरल्या. सगळ्यांनी त्यांच्या पायावर डोकं ठेवून त्यांचा आशीर्वाद घेतला.

आई-बाबांशी हसून हसून बोलत त्या फराळ करू लागल्या. त्यांचं खणखणतं हसू कीचनपर्यंत ऐकू येत होतं. एकदा मी दाराआडून डोकावले. त्यांची पाठ माझ्याकडे होती . कमरेपर्यंत रेशमासारखे काळेभोर केस चमकत होते. मला आशा तर्‍हेने बघताना कुणी बघू नये, म्हणून पुन्हा कचोर्‍या तळण्यात मग्न झाले.

ड्रायव्हर खाऊन, गाडी घेऊन निघून गेला. आई कीचनमध्ये आल्या नि मला म्हणाल्या , ‘तू तयार होऊन ताईंचा आशीर्वाद घे. मी तळते कचोर्‍या.’

मला तयार व्हायला तासभर लागला. लग्नाच्या वेळची जरी-अरीची वर्क केलेली साडी, मॅचिंग बांगड्या, बिंदी, लिपस्टिक आणि सोन्याचा हार असलेला सेट घालून मी किचनमध्ये आले. ’आई बघा बरं! सगळं ठीक आहे नं!’

‘अगदी नव्या नावारीसारखी दिसतीयस . कुणाची दृष्ट लागू नये. ताईंच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार कर. हे घे.’ चहाचा ट्रे माझ्या हातात देत आई म्हणाल्या.

ट्रे घेऊन मी सावकाश हॉलमध्ये आले. ट्रे डिनर टेबलावर ठेऊन मी आत्यांच्या पायावर डोकं ठेवलं. हलक्या गुलाबी रंगाच्या सिल्कच्या साडीचा हाताला स्पर्श झाला. दोन्ही पायांचे गोरे गोरे कोमल पंजे, नखांना लावलेले चमकदार नेलपॉलिश.

‘सौभाग्यवती हो!’ माझ्या डोक्यावर आपला हात ठेवत त्या म्हणाल्या. मग माझ्याकडे बघत त्या बाबांना म्हणाल्या , ‘तुला तर लाखात एक सून मिळालीय.’

‘ताई सगळी देवाचे कृपा!’

एकदा मी पापण्या उचलून आत्यांकडे पाहीलं. मी काही त्यांच्याइतकी गोरी नव्हते. पन्नास- पंचावन्न वर्षांच्या आत्या अजूनही पस्तीशीच्या वाटत होत्या. दुधासारख्या गोर्‍या पान होत्या. बोलके डोळे, सरळ नाक, फुगरे गुलाबी गाल, चेहरा देखणा, सुंदर. कानात सोन्याच्या मोठमोठ्या रिंगा, गळ्यात सोन्याचं लॉकेट, लांब मंगळसूत्र , एका बोटात हिर्‍याची , बाकीच्या तीन बोटात सोन्याच्या आंगठ्या, हातात गुलाबी बांगड्या, त्या मागे सोन्याचं मोठं कंगन… आई खरंच बोलल्या होत्या. आत्या सुंदर आहेत. श्रीमंतही आहेत.

‘गडबडीत सूनबाईसाठी आणलेली गिफ्ट गाडीतच राहून गेली. डॉक्टरसाहेब येतील तेव्हा घेऊन येतील.’

‘गिफ्टचं काय ताई, तुमचा आशीर्वाद मुलांना पुरेसा आहे.’

‘माझे  आशीर्वाद तुम्हा सगळ्यांसाठी नेहमीच आहेत. ‘

‘सूनबाई तू आत जा आणि तुझ्या सासूला पाठवून दे बरं. ताई जरा आराम करेल.’

मी कीचनमध्ये गेले. हितेश तिथेच नाश्ता करत होता. म्हणाला, ‘आज आत्याने तुला प्रथमच पाहीलं. काय दिलं तिने तुला? ‘

‘काहीच नाही.’

‘काहीच नाही? इतकी श्रीमंत आहे. एककावन्न… निदानाचे एकवीस तरी…तेवढे पण दिले नाहीत?’ त्याचं बोलणं कडवट होत गेलं.

‘हितेश, त्यांच्या देण्या-घेण्याने काही फरक पडत नाही. तू दोन-चार दिवस शांत रहा. ’ आई म्हणाल्या.

‘एककावन्न… एकवीस रुपये देण्याने ती काही गरीब होणार नव्हती आणि आम्ही श्रीमंत . मला माहीत आहे, मी लव्ह मॅरेज केलय, म्हणून ती नाराज आहे. मी अरेंज मॅरेज केलं असतं तर तिने खूप भेटी दिल्या असत्या.

‘हितेश त्यांचा आशीर्वाद मला पुरेसा आहे. शिवाय त्या म्हणाल्या आहेत, मला द्यायची गिफ्ट त्या गाडीत विसरल्या आहेत. डॉक्टरसाहेब येताना घेऊन येतील.’

‘आत्या आता खोटंही बोलू लागलीय तर…’ मनात कडवटपणा ठेवून हितेश निघून गेला.

मी साडी बदलून किचनमध्ये आले.

माझ्या स्वैपाकाचं आत्यांनी खूप कौतुक केलं. आई त्यांच्या मागे-पुढे करत होत्या. जुन्या जुन्या आठवणी काढत बाबा आणि आत्या खूप हसत, खिदळत होते. आत्याकडे बघता बघता मी मनात विचार करत होते,  इतक्या हसतमुख, चैतन्याने रसरसलेल्या आत्याने आपल्या मुलीला कसं मरू दिलं . अर्थात हा विषय कुणीच काढला नव्हता. त्यामुळे वातावरण प्रसन्न होतं. संध्याकाळी आई व्हरांड्यात आत्यांशी बोलत बसल्या. त्यांनी मला चहा करायला सांगितला. चहा झाल्यावर मी हाका मारल्या पण कुणीच आलं नाही म्हणून मग मीच चहा घेऊन व्हरांड्यात आले. तिथे आई नव्हत्या.

आत्याच्या हातात चहाचा कप देत मी विचारलं ,’ आई कुठे गेल्या?’

तुमची शेजारीण आली होती. काही कामासाठी तिला बोलावून घेऊन गेली. येईल आत्ता.’

‘ठीक आहे’, म्हणत मी आत जाऊ लागले. ‘सूनबाई कुठे चाललीस. बस जरा. गप्पा मारूयात. मी आल्यानंतर तू एकदा मला नमस्कार केलास, मग कुठे गायबच झालीस.’ काही न कळून मी तिथे तशीच उभी राहले. ‘हं!’ मी म्हंटलं पण मी इतकी थरथर कापत होते की हातातला ट्रेसुद्धा हालत होता.

माझी मन:स्थिती जाणून त्या म्हणाल्या, ‘आत्येसासुबाईंची इतकी भीती वाटते काय? थोडा वेळ माझ्याजवळ बस ना! ‘

ट्रे टेबलावर ठेवून मी त्यांच्याजवळ बसले. कपाळावर घामाचे थेंब जमले. कुणास ठाउक काय विचारतील.

‘मला वाटतं, माझ्या रागीट स्वभावाचं वर्णन करून तुला सगळ्यांनी घाबरवून टाकलेलं दिसतय. तुझ्या या आलं घातलेल्या स्वादिष्ट चहात, मी मीठ घातलय ,

असं खोटंच म्हणेन, असं वाटलं की काय तुला?’ त्यांनी माझ्यापुढे प्रश्न उपस्थित केला. मी गप्प बसले.

‘तसं मी बोलले असते, तर तुला राग आला असता न?  तसंच माझंही होतं . मला खोटी किंवा चुकीची गोष्ट मुळीच सहन होत नाही आणि राग आला की मी जरा जास्तच उग्र होते.

मी आत्तापर्यंत सामान्य होऊन त्यांच्याकडे बघू लागले.

‘तू लव्ह मॅरेज करून या घरात आलीस. हुंड्यासाठी तुला तुझे सासू – सासरे त्रास तर देत नाहीत ना! टोमणे तर मारत नाहीत ना! कारण आशा सुनांना खूप काही सहन करावं लागतं .

‘आई आणि बाबा दोघेही खूप चांगले आहेत. मला ते मुलीप्रमाणेच मानतात. ‘

‘मला माहेत आहे . ते तुला कधीच त्रास देणार नाहीत, पण मी माझ्या समाधानासाठी तुला विचारलं .

ट्रे घेऊन आत येताना मी अगदी चकित होऊन गेले. आत्यांचा माझ्याशी इतका ममत्वाचा व्यवहार. हुंड्यासाठी मला त्रास होत नाही ना, याचीही त्यांना चिता. उगीचच त्यांचं नाव घेऊन सगळ्यांनी मला घाबरवलं होतं.

दुसर्‍या दिवशी धुतलेले चार- सहा पिळे बादलीत घेऊन मी गच्चीवर वळत घालायला चालल होते. हितेशने केस पुसून टॉवेल माझ्याकडे टाकला. ‘लाली, हाही उन्हात वाळत घाल.’

‘लाली… कोण लाली?’ अचानक आत्याच्या हातून काचेचा ग्लास पडून त्याचे तुकडे तुकडे झाले. काचेचे तुकडे जसे त्यांच्या काळजात घुसले. घायाळ मनाने त्या तडफडू लागल्या.

आत्या, तिचं नाव लतिका आहे. तिच्या घरची सगळी प्रेमाने तिला लाली म्हणतात. मी पण कधी कधी …’

 ‘ओह … आच्छा … ‘ आपला घाबरलेला आवाज संयत करण्याच्या प्रयत्नाला ती लागली. मग म्हणाली, ‘तुला माहीत आहे ना, तिला दिवस गेलेत. मग जड सामान घेऊन तिला गच्चीवर पाठवायला नको नं?’

‘सॉरी आत्या…’ हितेषने माझ्या हातून बादली घेतली आणि तो गच्चीवर गेला. मीही त्याच्या पाठोपाठ गेले.

‘बाप रे बाप! आत्ता मी बचावलो. माझ्या लक्षातच राहिलं नाही . आत्याची मुलगी सुंदर होती. तिचे गाल आणि ओठ टोमॅटोसारखे होते म्हणून प्रेमाने ती तिला ‘लाली’ म्हणायची . हितेशाने आपल्या डोक्यावर हात मारला आणि ते खाली आले. तारेवर कपडे घालून मीही खाली आले. बघितलं तर आत्या डोळे पुसत होत्या. ‘लाली’ नाव ऐकल्यावर त्यांना आपल्या मुलीची आठवण झाली असणार. स्वाभाविकच होतं ते पण तिच्या मृत्यूलाही तीच तर जबाबदार होती ना. आता तिची आठवण काढून काय उपयोग?

लालीबद्दल जाणून घ्यायला मी उत्सुक होते.  उद्या आत्या गेल्या की आईंना तिच्याबद्दल विचारेन, असं म्हणून मी कामाला लागले.

रात्री झोपायच्या वेळी अचानक वीज गेली. ए.सी. मध्ये राहणार्‍या आत्या छपरा गावातल्या या घरात घामेघुम झाल्या.

‘हितेश, बिट्टी, वारा घालायचा हातातला पंखा लवकर घेऊन या. ‘ बाबा ओरडले.

दोघे जण दोन्ही बाजूंनी वारा घालत असूनही त्यांना घाम येताच होता. आज वीजसुद्धा आमचं नाक कापण्यासाथी सज्ज झाली होती. आम्हा गावावाल्यांना वीज असली काय नि नसली काय, काही फरक पडत नाही. पण हां, शहरात राहणार्‍यांना जरूर फरक पडतो. विजेबरोबर त्यांची झोपही निघून जाते.

‘नरेश गच्चीवर खाट टाक. गर्मीमुळे डोकं दुखायला लागलय.’

गच्चीवर फोल्डिंग कॉट टाकली गेली. त्यावर बिछाना तयार केला. आई मला थंड तेल देत म्हणाल्या, ‘ललिता ताईंच्या डोक्याला जरा तेल लावून डोकं चेपून दे. ‘

चांदणी रात्र होती. आकाशात तारे चमकत होते. थंड हवेच्या झुळुकी येत होत्या. एका कोपर्‍यात पेटलेला कंदील पिवळा प्रकाश पसरत होता. आत्याच्या डोक्याशी पोत्यावर बसत मी म्हंटलं, ‘आत्या आपण केस मोकळे करा. मी तेल लावते. ‘

‘राहू दे ललिता. मी औषध घेतलय.’

‘मग काय झालं?’ मी आत्याच्या केसांना तेल लावून डोकं हळूहळू चेपू लागले.

‘कधी कधी माझी लालीसुद्धा माझं डोकं आसच तेल लावून चेपून द्यायची.’ त्या स्फुंदू लागल्या. ‘तिचा आत्मा आता कुठे भटकत असेल, कुणास ठाऊक?’

लालीचा नाव ऐकून माझी निद्रिस्त आकांक्षा पुन्हा जागृत झाली. मी मागचा पुढचा विचार न करता बोलून गेले, ‘आत्या आपण लालीच्या प्रेमाचा स्वीकार केला असतात, तर आज आज आपण आशा दु:खी  झाला नसतात.’

‘सगळे मलाच दोषी ठरवतात पण सत्य कुणीच जाणून घेत नाहीत.’ 

‘मला जाणून घ्यायचय.’ परिणामाचा विचार न करता मी बोलून गेले.

‘ऐक. त्या सांगू लागल्या. ‘माझी मुलगी सुगंधा माझ्यापेक्षाही सुंदर होती. देवाच्या दयेने आमच्याकडे कोणत्याच गोष्टीची कमतरता नव्हती. मी सामाजिक कार्यकर्ती, पती निष्णात डॉक्टर, मुलगा-सूनही डॉक्टर. दूसरा मुलगा आय. ए. एस. ची तयारी करतोय.

सुगंधा प्राध्यापिका बनू इच्छित होती. आपल्या मैत्रिणीच्या भावाच्या शाळेतील प्रवेशाच्या संदर्भात तिची प्रवीणशी भेट झाली. तो शाळेत शिक्षक होता. खूप देखणा, स्मार्ट होता. दोघेही सज्ञान होते. विवाह करायला उत्सुक होते.’

‘मग काय झालं? आपण मागे का फिरलात?’

‘तेच तर सांगतेय ना! आत्या म्हणाल्या. ‘एक दिवस मी माझ्या ’नवकदम’ कार्यालयात  बसून कामकाजाची फाईल चाळत होते. ’नवकदम’मध्ये समाजाने ठोकरलेल्या आणि घर-दार नसलेल्या महिला राहतात. तिथे महिला आणि मुलींच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जातो. अनेक ठिकाणी आमच्या सस्थेचे बॅनर्स आणि पोस्टर्स लागलेले असतात. कुणालाही काहीही अडचण आली, तरी त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा.

मी एक फाईल चाळत असताना एक सर्वसामान्य दिसणारी बाई दोन मुलांना घेऊन आली. एक मुलगा तीन वर्षाचा होता, दुसरा पाच. 

मला नमस्कार करत ती दाटलेल्या कंठाने म्हणाली , ‘मॅडम माझं नाव राधा आहे. माझा पाती मला घटस्फोट देऊ इच्छितोय. मी घटस्फोट द्यावा म्हणून तो मला रोज मारपीट करतो. तो दुसर्‍या बाईच्या फेर्‍यात सापडलाय. म्हणतोय, ‘तिच्या बरोबर लग्न करणार.’ तसं झालं तर माझं आणि माझ्या मुलांचं कसा होणार? तो मला घरखर्चासाठी पैसेही देत नाही. मोठ्या मुश्किलीने मी घर चालवते. त्याला या मुलांबद्दल जराही माया वाटत नाही. त्याला बस! फक्त ती सुंदरी दिसते.’ बोलता बोलता ती रडू लागली. तिचं पाहून मुलंही रडू लागली.

मी राधाला शांत केलं आणि म्हंटलं  ,’ तू एक लेखी तक्रार दे. इतका विश्वास ठेव की तुझा नवरा तुला सोडू शकणार नाही. त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू. तू आपल्या पतीचा आणि त्या बाईचा फोटो घेऊन ये.’

‘मी उद्या घेऊन येते.’ असं म्हणून ती निघून गेली.

चार दिवसानंतर ती आली. तिच्या डोक्याला पट्टी बांधलेली होती.

‘राधा ही पट्टी कसली?’

‘मॅडम , माझ्या नवर्‍याने माझं डोकं फोडलं. तो माझा जीव घ्यायला उतावीळ झालाय. माझ्यापासून सुटका करून घेण्यासाठी तो या मुलांना अनौरस म्हणू लागलाय.’ ती रडू लागली.

‘मी तुला लेखी तक्रार घेऊन यायला सांगितलं होतं.’

तिने एक घडी केलेला कागद काढून माझ्यापुढे ठेवला आणि नवर्‍याचा फोटोही .

राधाने आपल्या नवर्‍याचं नाव प्रवीण लिहीलं होतं. काही क्षणासाठी माझ्या कपाळावर आठ्या पडल्या. ’हे भगवान, माझ्या मुलीचा प्रियकर आणि राधाचा नवरा यांचे एकच नाव … हा योगायोग तर नसेल ना! ते एकच नसतील ना?’ माझ्या मनात आलं.

मी डोकं झटकलं. एका नावाचे अनेक लोक असू शकतात.

‘तुझा नवरा काय करतो.?

शिक्षक आहे.

‘शिक्षक ?’

‘हो.’

मला स्वत:ला आवरणं फार कठीण गेलं॰ ही काय भानगड आहे. ‘त्या बाईचा फोटो आणलायस ?’

‘नाही. प्रवीणच्या पाकिटात आहे. त्याने एकदा मला दाखवला होता. परीसारखी सुंदर आह ती.’

राधाला शांत करून मी तिला तिच्या घरी पाठवलं पण स्वत: मात्र अशांत होऊन घरी परतले.  

सुगंधा हसत हसत फोनवर बोलत होती. मला बघताच तिने फोन कट केला.

‘लाली प्रवीणची कधी भेट घालून देतेस?

‘लवकरच. तो एका प्रॉब्लेममध्ये फसलाय.’

‘त्याचा प्रॉब्लेम म्हणजे त्याची बायको, मुले तर नाही.?’

‘तुला कसं कळलं?‘ सुगंधाला झटकाच बसला आणि माझ्यावर वज्रपात झाला.

‘अरे देवा, हे काय झालं?’

राधाने दिलेली लेखी तक्रार आणि प्रवीणचा फोटो मी तिला दाखवला.

‘प्रवीणची बायको त्याच्याशी भांडते आणि तुझ्याकडे तक्रार करते. अशिक्षित खेडवळ बायका अशाच असतात.

‘तू सुशिक्षित असूनही असलं घृणास्पद कृत्य करतेस.  तुला शरम वाटत नाही? एका विवाहित माणसावर प्रेम? त्याची बायको आहे. दोन लहान मुले आहेत. … आशा माणसावर प्रेम? तुला आपली मुलगी म्हणताना मला शरम वाटते. ‘ मी ओरडले.

घरातली सगळीच जण तिथे जमली. सगळ्यांनाच खूप वाईट वाटलं, की लालीनं हे काय केलं?

‘लाली प्रवीण जर अविवाहित असता, किंवा विधूरदेखील असता, तरी आम्ही त्याचं लग्न तुझ्याशी लावून दिलं असतं. पण त्याचं स्वत:चं वसवलेलं घर आहे. कुटुंब आहे. त्याची पत्नी रडत आहे. विलाप करते आहे की त्याची मुलं बिनबापाची होतील. तू चुकीच्या माणसावर प्रेम केलस. ठीक आहे. तरुण वयात मुलं – मुली भरकटतात. पण वस्तुस्थिती कळल्यावर सावरतातही. तू प्रवीणला सोड. तुझ्या जीवनात आणखी कुणी असेल तर सांग. आम्ही उद्याच्या उद्या तुझं लग्न लावून देतो. ‘ बाबा म्हणाले.

‘मला काहीही ऐकायचं नाही. मी प्रवीणशी लग्न करणार म्हणजे करणारच. त्याची पत्नी आणि मुलं जगली की मेली, याची मला मुळीच पर्वा नाही. ‘

मुलीच्या तोंडून हे शब्द ऐकताच माझ्या तना-मनाला जशी आग लागली. माझा माझ्यावरचा ताबा सुटला. माझे संस्कार असे निघाले? माझी मुलगी तीन-तीन जणांना चिरडून त्यांच्या रक्ताने आपला भांग भरणार? मी तिला थप्पड मारली. प्रथमच मारली. पुन्हा मारली. तिसर्‍यांदा मारणार, एवढ्यात मुलाने आणि सुनेने हात धरला.

‘आई तू अगदी वाईट आहेस.’ ती रडू लागली. तिचे वडील तिला खोलीत घेऊन गेले.

मुलगा आणि सून म्हणाली, ‘आई, तुम्ही प्रवीणला समजावा. आपल्या लालीशी तो चुकीच वागतोय. सांगा त्याला. ती अजूनही लहान आहे. भिन्न लिंगाचं आकर्षण आहे ते. प्रवीण आपल्याबरोबर लालीलाही बरबाद करण्याच्या मागे लागलाय. जेव्हा तो समजून घेईल आणि लग्नाला नकार देईल, तेव्हा लालीला समजेल. मी सारी रात्र रडून काढली. लाडाने वाढवलेल्या आपल्या लेकीशी मी खूप वाईट वागले होते. मी उभी होते, तिथून दोन वाटा फुटत होत्या. कळत नव्हतं मी लाली आणि राधा दोघींचं जीवन कसं सावरू?

सकाळी मी तिच्या खोलीत गेले. ती झोपली होती. रात्री ती जेवली नव्हती. मी तरी कुठे जेवले होते.

‘बेटा, ऊठ. तोंड वगैरे धुवून थोडं खाऊन घे. ‘ मी तिला उठवलं.

‘मला नाही खायचं. आधी माझं म्हणणं तू ऐक. प्रवीणशिवाय मी जगू शकणार नाही.’

‘आपला हा हट्ट सोड आणि अभ्यासकडे लक्ष दे. ‘

‘प्रथम मी प्रवीणशी लग्न करेन. अभ्यास, करियर सगळं नंतर.’ माझ्या संतापाने पुन्हा नागासारखा फणा काढला.

‘डोकं फिरलय की काय तुझं? मी पण बघतेच प्रवीणशी लग्न करून तू राधाचं जीवन कसं बरबाद करतेयस ते.’

‘या घरात एक तर तू राहशील, किंवा मी..’ मी पुन्हा तिच्यावर हात उगारला.

त्यानंतर मी रागारागाने प्रवीणच्या शाळेत गेले. त्याच्या प्रिन्सिपलना, मला त्याला भेटायला पाठवा, असा सांगून माझ्या ऑफीसमध्ये आले. 

दुपारपर्यंत तो आला नाही. मी माझ्या ओळखीच्या पोलिसाला त्याच्या शाळेत पाठवले. वाटलं, त्यामुळे तो थोडासा तरी घाबरेल. चार वाजता तो पोलीसाबरोबर आला. प्रथम त्याला काहीच कळलं नाही. मी राधाचा तक्रार अर्ज त्याच्यासमोर ठेवला. त्याच्या भुवया ताणल्या. ‘ तिची हे मजल… आज तिची अशी धुलाई करतो की …’

‘हे बघ, तू तिची धुलाई करण्यापूर्वी पोलीसच तुझी धुलाई करतील. आपला चांगला चाललेला संसार वार्‍यावर सोडून एका भोळ्या-भबड्या मुलीला फसवून तिचंही आयुष्य उध्वस्त करायला निघालायस तू.’

‘ मी सुगंधाला फसवलेलं नाही. आमचं प्रेम आहे एकमकांवर आणि आम्ही लग्नही करणार आहोत.

मी त्याला त्याची पत्नी, मुले, त्यांचं भरण- पोषण, पोलीस, कोर्ट – कचेर्‍या याबद्दल खूप समजावलं, पण तोही लालीसारखाच अडून बसला.

‘तुला माहेत आहे, लाली माझी मुलगी आहे.’

‘काय?’ तो चमकला.

‘होय. ती माझी एकुलती एक मुलगी आहे. तुझ्यामुळे तिचं आयुष्य बरबाद झालं, तर मी तुला सोडणार नाही.’ राधा आणि मुलं आश्रमात येतील पण तू मात्र सरळ तुरूंगात जाऊन सडत राहशील.’

‘राधा तुझी लग्नाची बायको आहे. तिला सोडून दुसरं लग्न … कसला माणूस आहेस तू! तुला माणूस म्हणायलाही मला शरम वाटते. राधाची सावळी चामडी आणि सुगंधाची गोरी चामडी… एवढाच तर फरक. पण यामुळे तू दोन्ही घरात आग लावू लागला आहेस. सुगंधाचं सौंदर्य किती दिवस राहील? ती म्हातारी नाही होणार? सुगंधाचे बाबा अगदी सावळे आहेत, म्हणून काय मी त्यांना सोडून दिलं? माझी सून एका पायाने लंगडी आहे, म्हणून काय माझ्या डॉक्टर मुलाने तिला सोडून दिलं. आपल्या पत्नीला त्याने इतकं समर्थ बनवलं की ती आज त्याच्या व्यवसायात त्याला मदत करते. तू मात्र वेडेपणा करतोयस. मुलांना शिकवतोस. स्वत: मात्र घसरणीच्या मार्गावरून चालू लागलाहेस. जर ही गोष्ट सरकारपर्यंत गेली, तर तुझी नोकरी जाईल, एवढं ल्क्षात ठेव. मी त्याला खूप बोलले. त्याचा अपमान केला.

तो काहीच बोलला नाही, फक्त ऐकत राहिला.

एवढ्यात सुनेचा फोन आला, ‘आई, लालीनं वीष घेतलय.’

‘काय ‘ माझ्यावर जसं आकाश कोसळलं.

‘आपण लगेच माझ्या नर्सिंग होममध्ये या.’

‘काय झालं मॅडम? ‘ प्रवीण घाबरला.

‘सुगंधाने वीष घेतलाय. तू लवकर राधाला आणि मुलांना घेऊन सुगंधा नर्सिंग होममध्ये ये.’

मी धडपडत, रडत हॉस्पिटलमध्ये गेले. सारखी प्रार्थना करत होते, ‘देवा, माझ्या मुलीला वाचव. माझं आयुष्य तिला लाभू दे. कृपा कर देवा…’ मी सगळ्या देव-देवतांना साकडं घालत होते.

मुलगा, सून आणि इतर सीनियर डॉक्टर्स तिच्यावर इलाज करत होते. तिचा चेहरा नीळा पडला होता.  श्वास खूप संथ चालत होता. मी फुटून फुटून रडत होते. माझे पती सकाळीच दुसर्‍या शहरात पेशंटला बघायला गेले होते. त्यांना यातले काहीच माहीत नव्हते.

सूनबाई म्हणाली, ’सकाळी दहा वाजता सगळे घराच्या बाहेर पडले. मी लालीला नाश्ता दिला. ती नंतर  खाईन म्हणाली. मी पण इथे आले. तीन वाजता मी आणि बाबूल जेवणासाठी घरी आलो, तेव्हा पाहीलं की लाली बिछान्यावर पडलीय आणि तिच्या तोंडातून फेस येतोय, शेजारीच तेज पॉईझनची बाटली पडली होती. जहर सगळ्या शरीरात पसरलं होतं.

‘आई.. आई… ‘लाली बेहोशीतच बडबडत होती.

‘माझी लाडली… लाली… लाली…’ मी तिचा हात हातात घेऊन आक्रोश करू लागले.

‘सॉरी ममा.. ममा.. मी चुकीचं वागत होते. मला जगायचय. मारायचा नाही ममा… मला वाचव.. वा… च.. व …

एवढ्यात प्रवीण बायको- मुलांना घेऊन आला. लालीला असं निष्प्राण पडलेलं बघून त्याच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ‘ सुगंधा मी आलोय…. बघ. डोळे उघडून बघ. मी… तुझा प्रवीण..’

‘प्रवी.. सॉ…री…’ पोलीस इन्स्पेक्टरही येऊन पोचले होते. सारी परिस्थिती बघत होते. बोलणं ऐकत होते.

‘ममा… मी वेडी आहे. जहर खा… सॉरी.’

लालीचा हात माझ्या हातातून सुटला .मी तिच्या गळ्याला मिठी मारून आक्रोश करू लागले. माझी    १७-१८ वर्षाची मुलगी आपल्या मूर्खपणामुळे या जगातून निघून गेली.

राधाच्या सगळं लक्षात आलं. माझे पाय धरून ती आक्रोश करू लागली. ‘मॅडम आपल्या मुलीची खूनी मीच आहे.’

प्रवीणही रडत होता. हाच माणूस माझ्या मुलीच्या आत्महत्येला कारणीभूत होता. त्याला फाशी झाली पाहिजे, माझ्या मनात आलं, पण मग राधा आणि तिच्या दोन मुलांचं काय होणार? माझी लाली

स्वत:च्या मूर्खपणामुळे गेली पण मला चुकीचं पाऊल उचलून चालणार नाही.

मी रडत रडत प्रवीणला म्हंटलं, ’तू राधाला आणि मुलांना घेऊन घरी जा. पुन्हा तुझं  तोंड मला दाखवू नकोस आणि पुन्हा दुसर्‍या कुणा मुलीबरोबर असं करू नकोस.’

तो आपल्या बायको, मुलांना घेऊन निघून गेला.

माझ्या प्राणप्रिय लालीला जाऊन आता पाच वर्षं होतील. ओ लाली… कुठे आहेस तू आता?’

आत्या वास्तवात येत म्हणाल्या आणि रडू लागल्या.

नाण्याची दुसरी बाजू समजल्यावर मी आत्यांपुढे नतमस्तक झाले. राधा आणि तिच्या मुलांचं जीवन सावरावं म्हणून त्यांनी आपली लाडकी मुलगी गमावली. माझ्या डोळ्यातही पाणी आलं

‘आत्या शांत व्हा. ‘ मी म्हंटलं.

‘रडू दे लाली…. सगळे मलाच दोषी मानतात. काळजात साठलेली वेदना, ठसठस आज तुझ्यामुळेच बाहेर पडली.’

 ’वाहिनी लाईट आले.’ बिट्टी खालून म्हणाली.

‘आत्या खाली चला. लाईट आले.’ आस-पासच्या घरातून येणार्‍या बल्ब आणि ट्यूब लाईटच्या प्रकाशात  चांदणी रात्र झगमगत होती. आपले अश्रू पुसून माझ्याबरोबर त्या खाली आल्या. त्यांना बिछान्यावर झोपवून मी जड मनाने माझ्या खोलीत आले.

दुसर्‍या दिवशी आत्यांचे यजमान मीटिंगहून परतले. त्यांच्यासोबत मोठी अ‍ॅटॅची होती. त्यात सगळ्यांसाठी महागड्या भेटी होत्या. सासरी असणारी आणि शिकण्यासाठी हॉस्टेलवर असलेला कुणाल यांच्यासाठीही भेटी होत्या. हितेशसाठी एक सुंदर सफारी सूट आणि सोन्याची अंगठी होती. माझ्यासाठी तर जवळ जवळ सोळा शृंगार होता. रेशमाचे नाजुक भरतकाम केलेली  सिल्कची साडी, सोन्याचा हार, कानातली झुंबरं, तोरड्या, विरवल्या, मासुळ्या, पर्स, मेकपचं सामान… काय नव्हतं त्यात? गिफ्ट मला मिळाली आणि चेहरा हितेशाचा खुलला. दोन तासात आत्या आणि डॉक्टर पाटण्याला जायला निघणार होते. आत्याची मिटिंग होती.

आत्या निघाल्या.. आईंनी त्यांची ओटी भरली. तांदूळ, पाच हळकुंड , नारळ, गूळ, ड्राय फ्रूटस असं सगळं साग्रसंगीत होतं ओटीत आणि पाचशे एक रुपये.

‘ताई आमच्याकडून काही चूक झाली असेल, तर क्षमा करा.’

‘अग वाहिनी, असं बोलून तू मला लाजवतीयस. तुम्ही सार्‍यांनी माझं खूप आदरातिथ्य केलत. अगदी मनापासून केलत. माहेरचं बायकांना किती अप्रूप असतं. एक ग्रामीण स्त्री म्हणते, ‘दुबळा पाबळा बंधू बहिणीले असावा. पावलीनी चोळी एक रातना विसावा.’ माझ्या बाबूचं घर तर स्वर्गासारखं आहे. खरं म्हणजे पैशाच्या पाकीटाची काय गरज होती आणि साडी

तरी इतकी महागडी कशाला घेतलीस? इतक्या सार्‍या कामाच्या गडबडीत ललिताने ब्लाऊजसुद्धा किती छान शिवलाय. अगदी फिट्ट बसलाय. धन्य आहे बाई तिची. हे बघ बाळ झाल्यावा कळव बरं का.’

‘ताई, हे काय सांगायला हवं.’ सगळ्यांनी आत्यांच्या पायावर डोकं ठेवून त्यांना नमस्कार केला. मला मिठीत घेत आत्यांनी खूप आशीर्वाद दिले.

आपल्या माहेरच्या चौकटीला प्रणाम करताना आत्याचे डोळे भरून आले .पितळयाच्या लोटीत ठेवलेलं पाणी आईंनी कारच्या दोन्ही बाजूला शिंपडलं. मग डॉक्टरांनी गाडी स्टार्ट केली. साडीच्या पदरात ओटी पकडून आत्यांनी हात हलवला. आम्ही भरल्या डोळ्यांनी त्यांना दूर दूर जाताना बघत राहिलो.

Leave a Reply

Your email address will not be published.