-
अनुवादक – उज्ज्वला केळकर
-
मूल कथा – खुल गई आँखें , लेखिका – नीतू सुदीप्ति ‘नित्या’
‘आई-बाबा, ही आभा आहे.’ आदित्याने आपल्याबरोबर आलेल्या मुलीची ओळख करून दिली. आभाने खांद्याला लावलेली पर्स सांभाळत आई, बाबा, आदित्यचा भाऊ आणि वाहिनी यांना खाली वाकून नमस्कार केला.
‘भाऊजी तुम्ही म्हणजे अगदी छुपा रुस्तूम निघालात. कुठे शोधलीत ही हिर्यासारखी मुलगी?’ ‘बॅंकेच्या खाणीतून… ‘आदित्य हसत हसत म्हणाला आणि सगळ्यांच्याच हास्याच्या फुलबाज्या उजळल्या. मोठे मोळे डोळे असलेल्या गोर्या, शिडशिडीत अंगाच्या आभाकडे तीन वर्षाची छोटी
टक लावून पहात होती. गोल, गुबगुबीत छोटीला आभाने कडेवर घेतले. तिच्या हातात चॉकलेट दिले आणि तिने गोड गोड पापे आभाच्या गालाचे घेतले. आभा पण तिचा पापा घेऊ लागली, तेव्हा मात्र तिने आपल्या गालावर हात ठेवले आणि म्हणाली, ‘माझे गाल उष्टे होतील.’
‘माझे गाल उष्टे नाही झाले?’ आभाने हसत विचारले. ‘नाही.’ असं म्हणत ती कडेवरून उतरली आणि उड्या मारत आईकडे निघून गेली. ‘मम्मी बघ, काकीनं मला चॉकलेट दिलेय!’ काकी म्हंटल्यावर आभाने आदित्यकडे पाहिले. ती लाजली आणि हसली.
वाहिनीने चहा, नाश्ता टेबलावर ठेवत म्हंटलं, ‘आभा गैरसमज करून घेऊ नकोस. मला तुला सोडून जावंसं वाटत नाहीये पण माझा नाईलाज आहे. मला डॉक्टरांकडे जायचं आहे.’
‘आत्ता? संध्याकाळी?’
‘त्याचं काय आहे, मी दुसर्यांदा काका बनणार आहे.’
‘ओह … छान!’
‘घाबरू नकोस बच्चू, माझ्यासारखा तूदेखील डॉक्टर कोमलच्या रांगेत उभा राहतोस की नाही बघ!’ असं म्हणत दादा हसला.
आदित्यबरोबर आभाचेही गाल लाल झाले. दादा-वहिनी निघून गेले. आदित्यचे आई-बाबा आभाला तिच्या घराबद्दल, घरातल्या लोकांबद्दल विचारू लागले. तेवढ्यात
आदित्यकडे त्याचे काहे मित्र आले, म्हणून तो आपल्या खोलीत निघून गेला. आभा सांगू लागली की तिला एक धाकटी बहीण आणि दोन धाकटे भाऊ आहेत. वडील एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करत होते. एकदा काम करताना त्यांचा हात मशीनमध्ये सापडला. मोठी जखम झाली. हात कापावा लागला. कंपनीने त्यांचीच चूक आहे, असं म्हणत नुकसान भरपाई द्यायला नकार दिला. खूपच गयावया केल्यावर मालकांनी काही पैसे त्यांच्या तोंडावर फेकले आणि त्यांना हाकलून दिले. अपंग झालेले वडील मनाने खचले आणि अखेर देवाघरी गेले. ती त्यावेळी दहावीत होती. ती म्हणाली, ‘त्या काळात कुणीही आमच्या सोबत नव्हते.’
‘आई आहे. बहीण पाचवीत आहे. दोन भाऊ आठवीत आणि नववीत आहेत. माझं नशीब चांगलं, म्हणून शिक्षण पूर्ण होताच मला बॅंकेत नोकरी मिळाली. आदित्य आणि मी एकाच दिवशी जॉईन झालो. दोघांच्यातही प्रेम, जवळिक निर्माण झाली आणि आता आयुष्यभर एकमेकांसोबत राहण्यासाठी विवाह बंधनात बांधू इच्छितो.’
‘ तू अगदी स्वार्थी आणि आपमतलबी आहेस.’ आईनं कुठलं वीषश ओकलं कुणास ठाऊक?
‘ हे सगळं आपण मला म्हणताय.’
‘होय!’ आई ठामपणे म्हणाली.
‘ जानकी वेडी झालीयस का? घरात आलेल्या पाहुण्यांशी असं बोलतात? आणि ही तर पाहुणीही
नाही. आपली होणारी सून…’
‘ बाबा, त्यांना बोलू द्या. थांबवू नका. मी कोण आहे, हे मला त्यांच्या तोंडून ऐकू दे.’
‘आई, सांगा, मी स्वार्थी आणि मतलबी कशी?’
‘ इतकी भोळी बनू नकोस. धाकट्या बहीण – भावंडांचा विचार न अरता, नोकरी लागली न लागली, तोवरच तू स्वत:चा संसार सजवायला निघालीयस. भावा-बहीणींचं भविष्य आधी घडवून मग आपल्याबद्दल विचार करायचास. आपल्या कुटुंबाला मधल्या धारेत सोडून आपल्या
पतीबरोबर झूला झुलवायला निघालीयास तू. मुलगी अशी असते? तुझ्यासारखी? स्वार्थी… किती तरी मुली आहेत जगात, त्या जन्मभर कुमारी राहिल्या आणि त्यांनी आपल्या भावंडांचं भविष्य घडवलं. आपल्या घर-परिवारासाठी आपलं सारं जीवन ओवाळून टाकलं. त्या महान ठरल्या आणि तू… शिकली, सवरलेली. आपल्या घरच्यांना कुणाच्या आधारावर सोडून आपलं जग वसवू बघतेस.
घरातली मोठी मुलगी असून आपल्या कर्तव्यापासून, जबाबदारीपासून पळ काढते आहेस.’ हे सारं बोलत असताना जानकीच्या डोळ्यापुढे एकदमच त्यांची बाळमैत्रीण अंजू उभी राहिली. हे सारं ऐकताना आभाचं रक्त उसळत होतं. रागारागाने तिच्या मुठी आवळल्या गेल्या. जानकी
श्रीवास्तव, आदित्यची आई नसती, तर तिने दाखवलं असतं, ती किती भयंकर वाघीण आहे. आजपर्यंत तिच्याबाबत कुणीच असं बोललं नव्हतं. ती आदित्यची आई असल्यामुळे तिचं बोलणं किती तरी वेळ तिने सहन केलं. पण आता पाणी डोक्यावरून जाऊ लागलं होतं.
आदित्यशी विवाह करायच्या लालसेने ती जर आज गप्प बसली, तर हीच गोष्ट सारी दुनिया तिला जिथे तिथे ऐकावत राहील. त्यापेक्षा ती आदित्यचं प्रेम, त्याच्यासोबत रंगवलेली सप्तरंगी स्वप्ने सार्याचा त्याग करेल. आतमध्ये ज्वालामुखी फुटण्यापूर्वीच ती बाहेर ज्वालामुखी फोडेल.
ती या बाईचा धिक्कार करेल. बाईच बाईची शत्रू असते म्हणतात, ते खरच आहे. कात्रीप्रमाणे तिने खूप जीभ चालवली. पण यापुढे नाही. सॉरी आदित्य तुझ्या आईमुळे मी तुझ्याशी आता विवाह करणार नाही. सॉरी… आभाच्या लाल डोळ्यातून जशा काही ठिणग्या उडत होत्या. ‘ होय! मी
स्वार्थी, मतलबी, नीच आहे. माझ्या परिवाराचं भविष्य अंधारात टाकून, माझा आनंद, खुशी मिळवण्यासाठी मी इथे आले. या चार मजली बंगल्यात आले. बंगला केवढा मोठा, पण या बंगल्यात राहणार्या मालकिणीचे विचार किती छोटे … आभाच्या मनात आलं.
‘जसं तुम्ही मला माझं वास्तव दाखवलत, तसंच मी तुम्हाला वास्तव दाखवते. हिशेब बरोबर. किती मुली आदर्श मुलगी आदर्श बहिणीचा पोकळ झगा घालून घराच्या बलिवेदीवर स्वाहा झाल्यात. काय मिळालं त्यांना? ना घर, ना पती, ना मुलं.’
‘मी माझ्या भावा-बहीणींसाठी कष्ट करावे. स्वार्थात्याग करावा पण ही जेव्हा मोठी होतील, तेव्हा ते काय माझ्याप्रमाणे आपल्या खुशीचा गळा घोटतील? मुळीच नाही. ते विवाह करतील आणि आपापला संसार थाटतील. म्हातार्या आईबरोबर मी एका कोपर्यात फेकली जाईन.
माझ्यासारख्या प्रौढ कुमारिकेकडे कुणी वळूनसुद्धा बघणार नाही.’ ‘ए मुली, काय बडबडतीयस?’ जानकी ओरडली.
‘ज्या भावा-बहीणींसाठी मी माझं आयुष्य पणाला लावलेलं असेल, ती माझ्याकडे दुर्लक्ष करतील. तेव्हा मला पश्चात्ताप होईल की मी यांच्यासाठी माझं प्रेम का ठोकरलं? का तेव्हा लग्न नाही केलं?
भाऊ आपल्या बायकोबरोबर आपल्या खोलीत बंद राहील. भावजयीचे दबलेले सुस्कारे माझ्या तना-मनाला विचलित करतील. मला चैन मिळू देणार नाहीत. त्यावेळी मला माझ्या चुकीची जाणीव होईल.
ब्रम्हचर्य व्रताचा झोळणा ओढून आणि मोठेपणाचा शिक्का उठवून मला बंद खोलीत कुणा पुरुषासाठी व्याकूळ व्हावं लागेल, त्याच्या प्रेमळ, स्नेहपूर्ण स्पर्शासाठी आसूसलेली होऊन मरून जाईन मी…. जशा माझ्या अंजू मॅडम… ‘
‘तू.. तू कोणत्या अंजूबद्दल बोलते आहेस?’ जानकीला आपल्या पायाखालची जमीन सरकतेयसं वाटलं.
‘त्या महान कुमारिकेची महान गोष्ट ऐकून तुम्ही काय करणार?’ ‘तू तिच्याबाद्दल सांग. ‘ जानकीचा स्वर कडक पण भिजलेला होता.
‘अंजू मॅडमना अविवाहित राहून आदर्श प्रस्थापित करायचा होता. ज्यांच्यासाठी त्यांनी विवाह न करण्याचा निश्चय केला होता, त्यांच्यासाठी त्या तीळ तीळ मरत गेल्या.’
‘काय अंजू गेली?’ जानकीला जबरदस्त झटका बसला. ’पण कोण ही अंजू मॅडम..?’
‘प्रथम आपण त्यांच्या मरण्याची पूर्ण कहाणी तर ऐका.’ आभा सांगत गेली. ‘चार दिवस त्यांचं प्रेत तसच सडत गेलं. त्यांच्या सडलेल्या प्रेताला म्युन्सिपाल्टीवाल्यांनी विजेच्या शवगृहात दहन केलं. अशा स्थितीत अंजू मॅडमना कोणती गती किंवा मुक्ती मिळाली असेल? प्रेत ताब्यात
घ्यायला नकार देणार्या भाऊ-बहिणीने विम्याचे पैसे घ्यायला मात्र ढोर मेहनत केली. समजा मॅडमचं लग्न झालं असतं , समजा त्यांचा मुलगा आणि सून अव्वल दर्जाची बदमाश असती, पती नालायक असता, तरी पतीकडून किंवा मुलाकडून मुखाग्नी मिळून ती मुक्त तरी झाली असती.
मुलगा आणि सुनेने तिच्या नावाने क्रियाकर्म करून तिला सद्गती दिली असती. भले तो देखावा असता, तरी त्यांच्या आत्म्याला संतुष्टी मिळाली असती.
घरच्या भावंडांसाठी मर मर मरत राहिल्या. काय मिळालं त्यांना?’ बोलून बोलून आभाला धाप लागली, तरी ती तशीच पुढे बोलत राहिली. शिकवणीला जाणार्या
आम्हा सगळ्या मुलींना अंजू मॅडम म्हणायच्या, ‘तुम्ही आपल्या जीवनात काहीही बना, पण कुमारिका राहू नका. घरच्यांबरोबर स्वत:चाही विचार करा. योग्य वेळी लग्न करण्याचा निर्णय घ्या. प्रत्येक स्त्रीसाठी पती हाच तिचं स्थान, तिचं छत, तिचं जीवन असतो. प्रत्येक स्त्री ही
पुरुषाविना बिन छ्ताचं घर असते. त्यात ऊन, थंडी, तूफान कधी प्राकृतिक रूपात, तर कधी मानवी रूपात येतात.‘
मग आभा हात जोडून म्हणाली, ‘खूप खूप धन्यवाद मिसेस श्रीवास्तव, आपण मला माझं वास्तव दाखवलंत. आदित्याचा विवाह दुसर्या कुणा जबाबदार, कर्तव्यनिष्ठ मुलीशी करा. मी दुसर्या कुणा मुलाशी लग्न करीन, पण लग्न नक्की करीन. मला अंजू मॅडमसारखं मरायचं नाहीये.
माझ्या लग्नाचं आमंत्रणपत्र मी आपल्याला नक्की पाठवीन. नमस्कार.’ ताड ताड बोलून ती निघाली.
‘अरे, आभा, तुझा चेहरा असा भयानक का दिसतोय.?’ आदित्य आपल्या मित्रांबरोबर तिथे आला होता.
‘काही नाही…’ एक क्षणभरही तिथे न थांबता आभा घराबाहेर पडली. ‘आई… बाबा काय झालं? आभा इतक्या रागारागाने का निघून गेली? आपल्याला काही म्हणाली
का? ‘
बाबांनी मग घडलं ते सगळं सांगून टाकलं. ’आई तू अगदी वाईट बोललीस. आदित्य म्हणाला आणि घराबाहेर निघून गेला. बाबांनी
जानकीपासून तोंड फिरवलं. छोटीदेखील आजीच्या मांडीवरून उतरली आणि आजोबांकडे निघून
गेली. आभाने सांगितलेली प्रत्येक गोष्ट जानकीच्या काळजावर हातोड्याचे घाव घालत होती…. ती आपली अंजू तर नसेल?
‘अंजू, तू मला सोडून निघून गेलीस. जीवंतपणी मरण यातना भोगल्यास आणि शेवटी एका अज्ञात मरणाला तुला कवटाळावं लागलं. तिच्या डोळ्यातून पाणी झरू लागलं. त्यात अंजूचा चेहरा दिसू लागला.
’विवाहानंतर मुलीचं उसळणारं यौवन या गोष्टीचा पुरावा आहे की पती तिच्यावर खूप प्रेम करतोय.’ अंजू म्हणाली होती. ती आत्ता आत्ताच शाळेतून आली होती. पर्सदेखील तिने ठेवली नव्हती. आपली प्रिय सखी जानकी सव्वा महिन्यांनी सासरहून माहेरी येत होती. तिच्या गळ्यात पडत जानकी म्हणाली, ‘तू मला इतकी चिडवते आहेस, म्हणालीस तर तुझ्यावर
देखील पतीच्या नावाचं लेबल डकवते. माझापेक्षासुद्धा तुझ्या गुलाबी कांतीवर यौवन अधीक खुलेल.’ सावळी जानकी लग्नानंतर खूप सुरेख दिसत होती. थोडी गरगरीत झाली होती. तिचे गालदेखील काहीसे गुबगुबीत झाले होते. अंजू चिडवत म्हणाली, ‘जीजाजी रोज बहुतेक तुला चोरून चोरून
मिठाई खिलवत असणार.’ ती जानकीला तिच्या सासरच्या लोकांबद्दल विचारात राहिली आणि खिदळत राहिली.
अंजूच्या आईने नाश्ता आणला. प्लेटमध्ये रसगुल्ले, पकोडे, पोहे, काय काय आणि कित्ती कित्ती होतं. ते सारं पाहून जानकी म्हणाली, ‘मावशी, तुम्ही माझा आज खासच पाहुणचार करत आहात.’
‘का करू नये? माझी मुलगी प्रथम सासरहून घरी आली आहे. आज पाहुणचार होणारच. उद्यापासून फक्त चहा…’ अंजूची आई म्हणाली. मग पुन्हा हास्याची लाट उसळली. नाश्ता करता करता ती अंजूच्या विवाहाविषयी ती बोलू लागली. पण अंजू घरातल्या जबाबदार्यांचा हवाला देत म्हणाली, ‘बाबांना अर्धांगाचा झटका आलाय. दोन वर्षांपासून ते हंतरुणातच आहेत….. मोठा भाऊ आणि वाहिनी यांनी पहिल्यापासूनच दुर्लक्ष केलय. शिवा आणि ऋतू अजून लहान आहेत.काशी कशी मी लग्न करणार?’
अंजू सकारी शाळेत शिक्षिका होती. पगार आणि ट्यूशन यांच्या पैशातून घर चालवत होती. मोठा भाऊ केव्हाच वेगळा झाला होता.
‘आज सकाळी सकाळीच माझ्या शेजारी राहणारा आणि तुझ्यावर लट्टू झालेला सुहास माझ्या घरी आला होता. तुला लग्नासाठी तयार कर, असं विनवणी करून मला सांगत होता. तो तुझ्या परिवाराची काळजी घेईल, असंही म्हणाला. का बिचार्याला तळमळत ठेवतीयस?’
‘जानकी हे प्रेम बीम सगळं बोलण्यापुरतं असतं गं! मी अगदी निश्चय केलाय. मी कुणाशीच लग्न करणार नाही. माझा त्याला निरोप दे. म्हणावं , तू दुसर्या कुणाशी लग्न कर. मी माझ्या सुखासाठी माझा परिवार वार्यावर सोडणार नाही.’ ती दृढ निश्चयाने म्हणाली.
‘तुझ्याशी नाही आता मावशींशीच तुझ्या लग्नाबद्दल बोलते. तसे माझे चुलत दीरदेखील तुझ्यावर फिदा आहेत’.
जानकी कीचनमध्ये काम करणार्या तिच्या आईला बोलावू लागली. ‘मावशी.. ‘‘वेडी आहेस का?’ अंजूने झटकन तिच्या तोंडावर हात ठेवत म्हंटलं . ‘एकदा सांगितलं ना, मी
कुणाशीही लग्न करणार नाही. माझं घर, माझी भावंड सांभाळीन.’ काही दिवस माहेरी राहून जानकी आपल्या सासरी परत गेली. ती अधून मधून आपल्या आईला
अंजूबद्दल विचारायची. आईकडूनच तिला कळलं की दहावीत येता येताच ऋतूने एका मुलाबरोबर लव्ह मॅरेज केलं. अंजूने तिला विचारल्यावर ती फटकन म्हणाली, ‘काय करणार? तू लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहेस. आमच्यावरही तोच निर्णय तू लादलास तर?’ त्याचा तिच्या आईवर इतका परिणाम झाला की आपल्या लकवाग्रस्त पतीला सोडून तीच देवाघरी गेली. शिवादेखील आपल्या बहिणीच्या जीवावर निर्लज्जपणे जगू लागला. वाईट मित्रांच्या संगतीने वहावत गेला. अंजूने विचार केला, त्याचं लग्न करावं म्हणजे तो सुधारेल. तो सुधारला पण भावाबरोबरच त्याच्या बायकोचाही बोजा तिच्यावर पडला. शिवा दिवस-रात्र बायकोबरोबर खोलीत
बसून वेळ काढू लागला. आयतं बसून गिळू लागला. त्याला कमाई करण्याबद्दल सांगितलं, तर म्हणाला, ‘तूच माझं लग्न केलंस, तूच खर्च चालव. आता ओरडून काय उपयोग? आता तिसराही येणार आहे. तोही खर्च तुलाच उचलावा लागेल.’ अंजू सुन्न झाली. हांतरूणावर पडलेले वडील, कामासाठी मरता मरता प्रौढ होत जाणार्या मुलीकडे बघत बघत अश्रू गाळायचे.
खूप दिवसांनी जानकी अंजूशी फोनवर बोलली. एव्हाना तिचे वडीलही गेले होते. ‘आता काय करणार अंजू? आता तर काकाही गेले. आता तू विवाह करून सेट हो.’
माझ्यासारख्या ४०-४२ वर्षाच्या प्रौढेशी कोण लग्न करणार ? माझी फार मोठी चूक झाली. आता पश्चात्ताप करून काय उपयोग? या घरात आणि या शहरात राहणं मला मुश्किल होतय. आता मी बदली करून दुसर्या शहरात जाते.’ अंजू म्हणाली.
त्यानंतर जानकीचा अंजूशी काहीच संपर्क झाला नाही आणि आता आभा म्हणते अंजू गेली. आपली अंजूच तर नसेल ती? आभा म्हणत असलेली? कुणी का असेना, पण तिची वेदनादायी कहाणी ऐकून जानकीला अनावर रडू आलं.
‘मम्मी, आजीनं रागावून काकीला पळवून लावलं.’ छोटी सांगत होती. दादा-वाहिनी जानकीजवळ
जाऊन विचारू लागले, तेव्हा तिची तंद्री तुटली. हो. माझ्याकडून चूक…’
‘चूक नाही, पाप केलायस तू… त्या मुलीच्या बाबतीतही आणि आदित्यच्या बाबतीतही…’ बाबा ओरडले.
‘आई, तू मागचा-पुढचा विचार न करता सगळ्यांना एका काठीने हाकतेस.’ दादा म्हणत होता.
‘आदित्यला फोन लाव.’
‘कशासाठी?’
‘मी चूक केलीय, तर मीच सुधारेन ती!’
दादाने फोन लावला. फोन उचलल्यावर आईचा आवाज ऐकताच आदित्य रागारागाने म्हणाला, ‘मी येतोय. मी काही इथे घरजावई बनून राहण्यासाठी आलेलो नाही.’
‘ बेटा, मला आभाशी बोलू दे.’
‘ती तुझ्याशी बोलणार नाही. आई, तुझ्या माहितीसाठी सांगतो, आभाने आपल्या घरच्या परिस्थितीची सगळी कल्पना मला दिली होती. मगच ती लग्नाला तयार झाली. विवाहानंतरही आपला निम्मा पगार ती घरी देईल, असं तिने माझ्याकडून कबूल करून घेतलं होतं. सासरी
राहून आपल्या घराबद्दलचं, घरातल्या लोकांबद्दलचं कर्तव्य ती पार पाडणार होती. तिच्या भावा- बहिणीलादेखील यामुळे जाणीव रहाणार होती की आज आपली ताई आपल्याला मदत करते आहे. उद्या तिने हात आखडता घेतला, तर आपण कुठे जाणार? त्यामुळे ती चुकीच्या मार्गाने जाणार नाहीत. आपलं भवितव्य घडवण्यासाठी ती जीव तोडून प्रयत्न करतील. आभा आताच २५- २६ वर्षाची आहे. भावा बहीणींच्या जबाबदार्या पार पडता पडता तिचं वय वाढेल. मग कोण करणार
तिच्याशी लग्न? म्हणूनच योग्य वेळी तिने योग्य निर्णय घेतलाय. आपल्यासाठी आणि आपल्या भावंडांसाठीही. पण आपल्या महरबानीने तो हवेतच विरून गेला.’
आभाचा प्लॅन ऐकून जानकीला शरमल्यासारखं झालं. मग ती म्हणाली, ‘ बेटा, मला तिच्याशी बोलू दे.’
‘ती आता नाही बोलणार तुझ्याशी!’
‘निदान तिच्या आईशी तरी बोलू दे मला.’
आभा गुढग्यात डोकं खुपसून चटईवर बसली होती. तिच्या दृष्टीने आता सगळं संपलं होतं. आभाच्या भोवती तिची भावंडे बसली होती. आदित्यने आभाच्या आईच्या हातात फोन दिला. आभाची आई म्हणाली, ‘ ताई, माझ्या मुलीने खूप कष्ट केले आहेत. माझ्याबरोबर धुणं-
भांड्याची, स्वाईपाक-पाण्याची कामं करून आपलं शिक्षण पूर्ण केलय. मी माझ्या स्वार्थासाठी माझ्या मुलीला इथे अडकवून ठेवणार नाही. पण…’
‘ताई. माझं जरा ऐका. मला जरा आभाशी बोलूदेत. माझी चूक झाली. ते सांगण्यासाठीच मी फोन केलाय.’
आईने फोन आभाच्या कानाशी धरला. जानकी बोलत राहिली. मला आभाची माफी मागायचीय. तिची प्रत्येक गोष्ट खरी होती. तिने तिच्या अंजू मॅडमची हकीकत सांगितली. माझीही एक अंतरंग सखी होती. तिचाही नाव अंजली… अंजूच म्हणायचे सगळं तिला. तिची शोकांतिकाही
अशीच होती. ती आभाची अंजू मॅडम असेल… नसेल… पण तिची हकीकत, तिचं भयावह मरण ऐकून माझे डोळे उघडले. तसं मरण कुणा शत्रूलाही मिळू नये. मी आदित्यचं आभाशी लग्न लावून द्यायला तयार आहे. प्लीज आपण नाही म्हणू नका. आभाला सांगा, समजावा की तिने
मला माफ करावं.‘ जानकीचा गळा भरून आला. ‘तुम्ही तिला घेऊन इथे या. म्हणजे मी तिची माफी मागेन की मीच तिथे येऊन तिची आणि तुम्हा सर्वांची माफी मागू? ‘
‘मी तुमचं फोनवरचं बोलणं ऐकलं. आईने मलाच फोन दिला होता. पण माझी एक अट आहे. विवाहानंतरही मी माझ्या घराची काळजी घेईन. माझ्या माणसांची देखभाल करेन. माझा अर्धा पगार माझ्या माहेरी देईन.‘ ‘तुझी प्रत्येक अट मला मान्य आहे बेटा!’ जानकीचा चेहरा आता उजळला.
———————————————————————————————————–
मूळ कथा- खुल गई आँखें, मूळ लेखिका – नीतू सुदीप्ति ‘नित्या’
द्वारा – श्री. भगवान प्रसाद
कोयला दुकान, राजा बाजार, कटेया रोड, बिहिया पिन – ८०२१५२
जि. भोजपूर (बिहार) मोबा. – ७०५०१०७२८५
अनुवादक – उज्ज्वला केळकर , मो. – ९४०३३,१०१७० e- id – kelkar1234 @ gmail.कॉम
१७६/२ `गायत्री ' प्लॉट नं १२ , वसंत दादा साखर कामगारभवनजवळ सांगली ४१६४१६
महाराष्ट्र